गा बाळांनो, श्रीरामायण
रघुराजाच्या नगरीं जाउन
गा बाळांनो, श्रीरामायण
मुनिजन-पूनित सदनांमधुनी
नराधिपांच्या निवासस्थानी
उपमार्गांतुन, राजपथांतुनि
मुक्त दरवळो, तुमचें गायन
रसाळ मूलें, फलें सेवुनी
रसाळता घ्या स्वरांत भरुनी
अचुक घेत जा स्वरां मिळवुनी
लय-तालांचें पाळा बंधन
नगरिं लाभतां लोकमान्यता
जाइल वार्ता श्रीरघुनाथां
उत्सुक होउन श्रवणाकरितां
करवितील ते तुम्हां निमंत्रण
सर्गक्रम घ्या पुरता ध्यानीं
भाव उमटुं द्या स्पष्ट गायनीं
थोडें थोडें गात प्रतिदिनीं
पूर्ण कथेचें साधा चित्रण
नका सांगुं रे नाम ग्राम वा
स्वतःस माझे शिष्यच म्हणवा
स्वरांत ठेवा हास्य गोडवा
योग्य तेवढें बोला भाषण
स्वयें ऐकतां नृप शत्रुंजय
संयत असुं द्या मुद्रा अभिनय
काव्य नव्हे, हा अमृतसंचय
आदरील त्या रघुकुलभूषण
नच स्वीकारा धना कांचना
नको दान रे, नको दक्षिणा
काय धनाचें मूल्य मुनिजनां?
अवघ्या आशा श्रीरामार्पण
Post Views: 80