Ramraksha Line by Line
रामरक्षा स्तोत्रामधील वज्रपंजर नावाच्या कवचातील प्रत्येक ओळीची उजळणी करूया.
रामरक्षा स्तोत्रामधील वज्रपंजर कवचाचा आपण सखोल अभ्यास करत आहोत.
वज्रपंजर या नावाचे हे कवच आहे.
आपले रक्षण प्रभू श्रीरामचंद्रांनी करावे, यासाठी रामरक्षेच्या चौथ्या श्लोकापासून, आपल्या शरीराच्या एकेका अवयवाचे रक्षण प्रभू श्रीरामचंद्रांनी कसे करावे, यासाठी प्रभू श्रीरामचंद्रांना केलेली ही विंनती आहे, प्रार्थना आहे.
रामरक्षा स्तोत्रामधील वज्रपंजर नावाच्या कवचातील प्रत्येक ओळीची उजळणी करूया.
१ राघवः मे शिरः पातु । = रघुकुलात जन्मलेला (राम) माझ्या डोक्याचे रक्षण करो.
२ दश-रथ-आत्म-जः (मे) भालं (पातु)। = दशरथाचा पुत्र (राम माझ्या) कपाळाचे रक्षण करो.
३ कौसल्येयः मे दृशौ (पातु) = कौसल्येचा मुलगा (राम माझ्या) डोळ्यांचे रक्षण करो.
४ विश्वामित्र-प्रियः मे श्रुती (पातु) । = विश्वामित्रांचा लाडका (राम माझ्या) कानांचे रक्षण करो.
५ (मे) घ्राणं पातु मख-त्राता = यज्ञाचे रक्षण करणारा (राम माझ्या) नाकाचे रक्षण करो.
६ (मे) मुखं सौमित्रि-वत्सलः (पातु)। = सुमित्रेच्या मुलाचा सखा (राम माझ्या) तोंडाचे रक्षण करो.
७ (मे) जिव्हां विद्या-निधिः पातु । = विद्येचा संचय असणारा (राम माझ्या) जिभेचे रक्षण करो
८ (मे) कण्ठं भरत-वन्दितः (पातु)। = भरताने ज्याचे वंदन केले तो (राम माझ्या) गळ्याचे रक्षण करो.
९ (मे) स्कन्धौ दिव्य-आयुधः पातु = तळपती आयुधे असणारा (राम माझ्या) खांद्यांचे रक्षण करो.
१० (मे) भुजौ भग्न-ईश-कार्मुकः (पातु)। = ज्याने शिवधनुष्य मोडले तो (राम माझ्या) बाहूंचे रक्षण करो.
११ (मे) करौ सीता-पतिः पातु = सीतेचा जो पति तो (राम माझ्या) हातांचे रक्षण करो.
१२ (मे) हृदयं जामदग्न्य-जित् (पातु)। = जमदग्नींच्या मुलाला (परशुरामाला) जिंकणारा (राम माझ्या) हृदयाचे रक्षण करो.
१३ (मे) मध्यं पातु खर-ध्वंसी । = खर-राक्षसाचा नाश करणारा (राम माझ्या) मध्यभागाचे रक्षण करो
१४ (मे) नाभिं जाम्बवत्-आश्रयः (पातु)। = जाम्बवताला ज्याचा आश्रय लाभला तो (राम माझ्या) बेंबीचे रक्षण करो
१५ सुग्रीव-ईशः (मे) कटी पातु । = सुग्रीवाचा स्वामी (राम माझ्या) कमरेचे रक्षण करो.
१६ (मे) सक्थिनी हनुमत्-प्रभुः (पातु)। = हनुमंताचा प्रभू (राम माझ्या) मांड्यांच्या वरील भागांचे रक्षण करो
१७ (मे) ऊरू रघु-उत्तमः पातु रक्षः-कुल-विनाश-कृत् । = रघूंमध्ये उत्तम आणि राक्षसांच्या कुळांचा विनाश करणारा (राम माझ्या) मांड्यांचे रक्षण करो.
१८ (मे) जानुनी सेतु-कृत् पातु । = सेतू बांधविणारा (राम माझ्या) गुडघ्यांचे रक्षण करो
१९ (मे) जङ्घे दश-मुख-अन्त-कः (पातु)। = दहा तोंडे असलेल्याचा (रावणाचा) अन्त करणारा (राम माझ्या) पिंढर्यांचे रक्षण करो.
२० (मे) पादौ वि-भीषण-श्री-दः पातु । = विभीषणाला कल्याणकारी वैभव देणारा (राम माझ्या) पावलांचे रक्षण करो
२१ रामः (मे) अखिलं वपुः (पातु)। = राम माझ्या सर्वच देहाचे रक्षण करो.
रामरक्षा स्तोत्रामधील वज्रपंजर नावाच्या कवचात श्रीरामांचे चरित्र म्हणजेच सम्पूर्ण श्रीरामायणच कसें क्रमवार गोंवलें आहे, तें आपण पुढील भागात पाहूया.