Ramraksha Shlok4
“रामरक्षा” स्तोत्रामधील “वज्रपंजर” कवचाचा आपण सखोल अभ्यास करत आहोत.
वज्रपंजर या नावाचे हे कवच आहे.
आपले रक्षण प्रभू श्रीरामचंद्रांनी करावे, यासाठी रामरक्षेच्या चौथ्या श्लोकापासून, आपल्या शरीराच्या एकेका अवयवाचे रक्षण प्रभू श्रीरामचंद्रांनी कशा प्रकारे करावे, हे सांगणारी प्रभू श्रीरामचंद्रांना केलेली ही विंनती / प्रार्थना आहे.
माझ्या शिराचे (मस्तकाचे / डोक्याचे) रक्षण राघवाने (रघुकुलात जन्म घेतलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांनी) करावे, कारण ते कुळाची परंपरा जपणारे आहेत. डोक्यातील विचारांचे महत्व आपण जाणतोच. प्रत्यक्ष प्रभू श्रीरामचंद्र डोक्याचे रक्षक असताना नकारात्मक विचारांना डोक्यात कोणतेही स्थानच शिल्लक उरत नाही.
कपाळाचे रक्षण, दशरथात्मजः म्हणजे दशरथाच्या पुत्राने (दशरथ राजाचा मुलगा असा अवतार घेतलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांनी) माझ्या कपाळाचे म्हणजेच माझ्या भाग्याचे रक्षण करावे. कपाळावरील रेषा काहीही सांगत असल्या तरी प्रत्यक्ष प्रभू श्रीरामचंद्र कपाळाचे रक्षक असताना भाग्योदय (जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उन्नती आणि प्रगती) होणे हे निश्चित आहे, याबद्दल जराही शंका शिल्लक राहूच शकत नाही.
माझ्या डोळ्याचे रक्षण कौसल्येचा पुत्र म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांनी करावे. पाहणे आणि दृष्टी असणे यात फरक आहे. त्यामुळे कौसल्येचा (कौसल्या म्हणजे जी कुशल आहे) आशिर्वाद लाभलेला तिचा पुत्र प्रभू श्रीरामचंद्र माझ्या डोळ्यांचे रक्षण करोत. प्रत्यक्ष प्रभू श्रीरामचंद्र डोळ्यांचे रक्षक असताना कोणताही पूर्वग्रह / दुषित दृष्टीकोन नष्ट होऊन, जे जे जसे जसे आहे ते ते तसे तसेच बघण्याची दृष्टी प्राप्त होण्याची ही खात्रीच आहे. मी कोण आहे आणि माझ्या मध्ये काय काय सामर्थ्य आहे याची स्पष्ट जाणीव दृष्टीपथात येणार आहे.
माझ्या दोन्ही कानांचे रक्षण विश्वामित्रांचा प्रिय शिष्य असणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्रांनी करावे कारण कसे ऐकावे हे फार महत्वाचे आहे. श्रवणाचे महत्व सांगताना समर्थ श्री रामदास स्वामी म्हणतात, “श्रवण केलियाचे फळ, क्रिया पालटे तात्काळ”. प्रत्यक्ष प्रभू श्रीरामचंद्र कानाचे रक्षक असताना सांगणारा काय सांगतो आहे तेच श्रवण केले जाईल. आपण जे ऐकू इच्छितो (पण प्रत्यक्षात सांगणारा जे सांगतच नाहीए) ते आता यापुढे, प्रभू श्रीरामचंद्र कानाचे रक्षक असल्यामुळे ऐकलेच जाणार नाहीए. आता केवळ सत्य श्रवण सुरु राहिल.
पाचवा श्लोक उद्या आपण समजून घेऊया.